कणा - ओळखलत का सर मला? (कवी कुसुमाग्रज)

Friday, May 25, 2012
ओळखलत का सर मला? - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा!
-कवी कुसुमाग्रज


2 comments:

swamiji tiwari said...

akam mast

swamiji tiwari said...

aaplya mayboli marathhit li hi kavita ''p''oo''s''h''a''l''..kahi sangoon jate

Post a Comment