Showing posts with label कुसुमाग्रज. Show all posts
Showing posts with label कुसुमाग्रज. Show all posts

वेडात मराठे वीर दौडले सात...

Monday, July 16, 2012


वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥
"श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात"
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील"
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ३ ॥
"जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत"
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ८ ॥
READ MORE - वेडात मराठे वीर दौडले सात...

कणा - ओळखलत का सर मला? (कवी कुसुमाग्रज)

Friday, May 25, 2012
ओळखलत का सर मला? - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा!
-कवी कुसुमाग्रज


READ MORE - कणा - ओळखलत का सर मला? (कवी कुसुमाग्रज)