३८)
काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.
गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,
' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत
३९)
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,
' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !'
पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.
त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !
४०)
एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?
एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता.
तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... '
पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल.
४१)
एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.
४२)
एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं.
' हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ' अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.
४३)
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. '
४४)
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं. '
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?'
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात
४५)
अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले,
' चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज.
' चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते.
जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. '
चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !'
४६)
पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल ' हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !'
४७)
१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.
४८)
' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा .
त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !
४९)
'' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... ''
'' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?''
फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ...
बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा .
50)
एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले,
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? "
त्यावर पु ल लगेच म्हणाले,
" हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही. "
51)
एकदा शाळेत अर्ध-निद्रावस्थेत असताना गुरुजींनी पु.लं.ना दरडावून विचारले, "पुर्श्या! ओपोझिटचे स्पेलिंग सांग बघू..."
पु.ल. घाबरून उठत म्हणाले, "ओ डबल प्पो.."
52)
‘पूल ७५’ हे पुस्तक पुलंना अर्पण करण्याचा समारंभ होता. त्या वेळी अगोदर जयंत नारळीकर यांचे भाषण झाले. आपल्या भाषणाच्या सुरवातीला ते म्हणाले, ” बंधू भगिनीनो असे मी म्हणत नाही. कारण श्रोत्यांमध्ये माझी पत्नी आहे.
पुलंची बोलण्याची पाळी आली तेव्हा ते म्हणाले, “मला बंधू आणि बघिनी म्हनायाले काहीच अडचण नाही. माझी पत्नीच मला ‘भाई’ म्हणते!”
53)
दिल्लीच्या प्रकाशकांच्या सभेत पुलं म्हणाले होते, “कसायानी आपल्या सभेचे अध्यक्षपद एखाद्या गायीला द्यावे तसे वाटतेय.
54)
नाशिकला कॉलेजच्या स्नेहसंमेलनात केलेले धमाल भाषण. या भाषणात पुलं म्हणाले होते, ‘मी आज सकाळीच तुमच्या कॉलेजच्या मुलीला विचारले, तुम्हाला ज्ञानेश्वरांचे काय काय आहे? त्यावर ती म्हणाली, ‘ १० मार्कांचा ज्ञानेश्वर आहे’ मी पुढे विचारणार होतो कि, ‘माझे साहित्य किती आहे?” पण पहिल्या उत्तराने मला पहिला प्रश्न विचारण्याचा धीर झाला नाही. कारण द्यानेश्वारच १० मार्कांचा तर मला एक लक्षांश मार्क असेल कि नाही कोणास ठाऊक!”
याच भाषणात पालकांच्या अज्ञाना बद्दल पुलं म्हणाले, एखाद्या मुलाने जर म्हटले कि, ‘मी ‘अर्धमागधी घेतो’ कारण ते स्कॉरिंग आहे.’ तर पालक म्हणतात, मग ‘पूर्णमागधी’ का नाही घेत?’ अर्धमागधीच का घेतो?’ पालकांच्या (पूर्ण) अगाध ज्ञानावर याहून वेगळे भाष्य करण्याची काहीच गरज नाही.
55)
पु. ल. गेल्यावर आमचा कलकत्त्याचा समीक्षक मित्र शमिक बॅनर्जी पुण्यात आला होता त्याने ही आठवण सांगितली. पु. ल. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पाच वर्षे मानद उपाध्यक्ष होते. एका बैठकीनंतरच्या भोजनोत्तर मैफलीत एक प्रसिद्ध नाटककार खूप सात्विक संतापले होते. त्यांना न विचारता त्यांच्या नाटकांचे कोणी अन्य भाषेत प्रयोग केले होते. त्यामुळे कॉपीराईटचा भंग होतो असा प्रकार होता. त्यांची अनेकांनी समजूत घातली पण त्यांचा राग धुमसत होताच. वाद वाढल्यावर पु. ल. तेथे असलेली हार्मोनियम काढून म्हणाले, मी आता तुम्हाला माझा प्रयोग करुन दाखवतो. त्याचा मात्र कॉपीराईट कोणाकडे नाही. कोणीही हा प्रयोग गावोगाव कोणत्याही भाषेत करावा, असे म्हणून पु. लं.नी हार्मोनियम वाजवणे सुरु केले. जरा रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले. त्याला अर्थातच अभिनयाची जोड होती. पण एकही शब्द नव्हता. नंतर सर्वांच्या लक्षात येऊ लागले की आलापी आणि तानांमधून एक तरुण आपल्या प्रेयसीकडे प्रेमयाचना करतो आहे, तानांमधून ती तरुणी लाजते आहे. मग ताना मारीत त्यांचे प्रेम चालते. मग दोघांचे ताना आणि आलापीमधून लग्न होते. ताना मारीत बाळंतपण होते. मग भांडण... पुन्हा ताना... पुन्हा प्रेम जमते. ताना मारीत संसार फुलतो असा मामला पु. लं.नी एकही शब्द न उच्चारता केवळ ताना आणि आलापीमधून अर्धा तास जिवंत केला. समोरचे सगळे गडाबडा लोळायचे तेवढे राहिले होते. शमिक म्हणाला, 'कोणतीही तयारी, पूर्वसूचना नसताना हा माणूस इतका चोख परफॉर्मन्स देत असेल तर त्यांचे परफॉर्मन्स विषयीचे चिंतन किती परिपक्व असेल? ह्या माणसाभोवती महाराष्ट्राचे सांस्कृतिक जग केंद्रित का होते, ह्याचे जणू उत्तरच पु. लं.नी आम्हाला त्या अर्ध्या तासात दिले. '
1 comments:
Marathi the gr8...
Post a Comment